Love Poems In Marathi – प्रेमावर कविता

Love Poems In Marathi: “प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे काय असतं? शब्दांमध्ये नाही सांगता येणार असं हे ब्रह्मांड असतं.” तरी पण प्रेमात व्यक्त व्हायला शब्दांचाच आधार घ्यावा लागतो. थोडक्या शब्दात भावनांचा विशाल भांडार मांडणे शक्य आहे ते फक्त कवितेतून. इथे हि मी असाच प्रयत्न केलेला आहे. प्रेमात अंतरंगातील भाव सांगणाऱ्या काहि कविता मी इथे सादर करीत आहे.

6 Love Poems In Marathi – प्रेमावर कविता

१) कविता

तू आहेस तर मी आहे.
मी आहे तर या कविता.
कविता आहे तर प्रेम आहे.
आणि प्रेम आहे तर जीवन.

जीवन आहे तर जीव आहे.
जीव आहे तिथे हृदय.
हृदय आहे तर भावना आहेत.
आणि भावना तिथे तू.

तू आहेस तर मी आहे.
मी आहे तर तुझे हास्य.
तुझे हसनं माझा आनंद आहे.
माझा आनंद तुझे सुख.

तुझे सुख माझे क्षण आहेत.
माझे क्षण माझी ओळख.
तू आहेस तर मी आहे.
आणि मी आहे तर या कविता.

: सुशांत अणवेकर

२) तिचा मूड

तिचा मूड म्हणजे एक गूढ.
कधी उन्हाळ्यात आलेली हुडहुड.
तर कधी वैतागलेल्या बाळाची लुडबुड.

तिचा मूड म्हणजे भिजलेलं पान.
कधी वाळवंटात हिरवं रान.
तर कधी काट्यात तुटलेलं वहान.

तिचा मूड म्हणजे सळसळत्या धारा.
कधी नभशिखरातला वारा.
तर कधी अनाथाला निवारा.

तिचा मूड म्हणजे हि एक धोका.
रुतलेला बाभळीचा काटा.
पण, पण, पण,
तिचा मूडच तिच्या असंख्य छटा.
आणि माझ्या जिवंत हृदयाचा एक ठोका.

: सुशांत अणवेकर

३) वाकडं नाक

सजनी गोड माझी वाकड्या नाकाची.
शेकडो नाकांमध्ये एकमेव लाखाची.

वाकडं नाक तुझं, हिमालयातला घाट.
शेंडा शिखर तुझा, आणि वळणदार वाट.

भूमितीच्या वहि वर कंपासाची फुली जणू.
विज्ञानाच्या पुस्तकातील अमिबाचा आकार जणू.

वाकडं नाक तुझं. वाकडा बाण जसा.
वाकडा असूनही हृदयात थेट खुपला कसा?

बोटांच्या चिमटीने ओढून जरा पाहू का ग?
कि दातांनी चावा घेऊन प्रयत्न करून पाहू का ग?
नाकाला नाक लावून नाक तुझं मापू का ग?
पण ओठांचं करू काय मी? चिकटपट्टी लावू का ग?

सजनी गोड माझी वाकड्या नाकाची.
शेकडो नाकांमध्ये एकमेव लाखाची.

:सुशांत अणवेकर

४) चुंबन

एका चुंबनाचा डाव.
एक प्रेमाचा ग भाव.
भिजलेल्या तया होठांवर,
माया होठांचा मिलाप.

एकमेकांच्या कुशीत,
झोपण्याची तवा घाई.
निमित्त गा थोर.
नजरा दूर कशा राही?

ओठ चुंबक जाहले.
ओठ चुंबन पावले.
एकमेकांचा तो श्वास
एकमेकात धावले.

जीभ जिभेवरी फिरे.
दात ओठांना हा धरे.
पुन्हा पुन्हा करूनही,
ती ओढ का ना सरे?

लाळ लाळ एक झाली.
दोन मन एक झाले.
एका छोट्या शाली मद्दी
दोन अंग एक झाले.

एका चुंबनाचा डाव.
एक प्रेमाचा ग भाव.
भिजलेल्या तया ओठांवर,
माया ओठांचा मिलाप.

: सुशांत अणवेकर

५) आठवण

किती आठवावं? नि किती आठवावं तुला?
एवढूस ते हृदय; कुठे साठवावं तरी तुला?

आठवणींच्या जगात माझा दिवस विरून जातो.
येतं गालावर हसू अन क्षण सरून जातो.

कधी हसू हि येतं नि कधी रडू हि येतं.
आठवणींचं ओझं सालं धड जगू हि न देतं.

तरी जिण्याचा आधार त्या आठवणींचाच आहे.
भाव गुलाबी हे माझे सांगा का उगाचाच आहे?

आठवणीचं काहूर मग ओढ तुझी लागते.
कोरोना चा संप हा मग बस खाली सांगते.

तुझ्या आठवणींच्या लहरीत ते व्हायरस जळून मरतील.
थोडा धीर आपण धरू; राहिले दिवस हि सरतील.

तोपर्यंत हँड सॅनिटाइझर संपलेला असेल. आणि तुझ्या हातात माझा हात असेल. इतिहास हेच सांगतो कि, “जब जब दो प्यार करने वालो के बीच कोई आया तो वो साला खाक मे मिल गया।”

: सुशांत अणवेकर

६) चिडके

ये चिडके जरा चिडशील का?
चिडून जरा माझ्याशी नडशील का?

माझ्या मजेचे खेळ तुला चिडवण्यात आहे.
माझ्या वेळेचा डाव तुला पिडण्यात आहे.

मी मुद्दाम नाही करत. नाईलाज माझा आहे.
लोकडाऊन च्या टाईमपास चा इलाज हाच आहे.

दार्जिलिंग ची थंडी बघ ना संपतच नाहि.
तू चिडल्या विना इथे शेकोटी पेटतच नाही.

चिडशील तर लक्षात ठेव अबोला नको धरू.
उघडशील तोंड तर, फक्त शिवी नको मारू.

दिवसभर बसून बसून व्यायाम कुठे होतो?
चिडल्यावर जरा तरी कॅलरी बर्न होतो.

पण संयम थोडा ठेव मोबाईल नको फोडू.
वांदे होतील माझे; शेड्युल नको मोडू.

चिडक्या तोंडावरचा तुझा चंद्र भारी दिसतो.
माहीत नव्हतं ना तुला? म्हणून तर सांगतो.

ये चिडके जरा चिडशील का?
चिडून जरा माझ्याशी नडशील का?

शेवटी कसं आहे; माझ्या चिडवण्यात हि प्रेम आहे आणि तुझ्या चिडण्यात हि प्रेम आहे.

:सुशांत अणवेकर

जिवंत भाव असतील तेव्हाच त्या मना कडून लेखणीतून शब्दात उतरतात. आणि पोहचतात वाचकाच्या मनापर्यंत. लिहण्यात हि आनंद असतो आणि वाचनात हि. लिहलेले लिखाण जेव्हा वाचकाला भावेल; आवडेल तेव्हाच त्या मांडलेल्या शब्दांमध्ये जीव येतो. आणि जिवंत राहतो त्या व्यक्तितील लेखक. आपल्या प्रतिक्रिया नक्कीच कमेंट मध्ये कळवा.

धन्यवाद,

Add Comment